भंगार ❤️ अशोक जाधव यांचं ‘भंगार’ हे त्यांच आत्मचरित्र आहे. परंतु या पुस्तकाचा व्याप पाहता ते भटक्या गोसावी समाजाचं वस्तुस्थिती मांडणार पुस्तकं वाटतंय. पत्रा,लोखंड,बाटल्या,प्लास्टिक हे लोकांच्या उकीरड्यावर जाऊन गोळा करणं,ते भंगारवाल्याला विकणे आणि त्यावर जगणारे हे लोकं. गोसावी समाजाचं भटकं जीवन,तीन दगडांची चूल,तीन काठ्यांवर उभी पाल,भंगार गोळ्या करण्यातील मरण यातना,जातपंचायतीचा बडेजाव,स्रीचं अस्तित्वहीन जगणं.मुलांच जन्मतः नि जन्मभर वंचित जगणं.या समाजातल्या स्रीया नि मुलं मोठी झोळी घेऊन भंगार गोळा करण्याच काम करतात.भिकही मागतात.पुरुष मात्र पालात दारु पिऊन लोळून दिवस काढतात.बायका-पोरांना शिवीगाळ,मारहाण करतात. हे आत्मचरित्र वाचत असताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात.इतक्या प्रतिकुल परिस्थितीत अशोक जाधवांनी स्वतःचा घेतलेला शोध,माणसास कुत्र्या,डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था एवढी निष्ठूर कशी काय असु शकते? गोसावी समाजात जातपंचायतला असलेले महत्व. पंच म्हणजे ‘पंच परमेश्वर’. त्यांच्या जिभेवर येणारा शब्द म्हणजे कायदा.जो पैसे देईल त्याच्या बाजुने न्याय.या पंचायतीत स्रीची किंमत शून्य.स्रीवर कोणीही संशय व्यक्त करु शकतो.स्री म्हणजे पापी हे गृहीतच.नवरा मनाला येईल तेव्हा सोडचिठ्ठी देणार.जातपचांयत आपल्या मर्जीनं तिचा दंड भरुन घेऊन दुसऱ्या पुरुषाच्या स्वाधीन करणार.हे खुप भयंकर आहे. समाजाच्या जातपंचायतच्या विरोधात अशोक जाधव दंड थोपटतात,जातपंचायतची मिरासदारी मोडीत काढतात.समाजातुन पहीले पदवीधर होतात.आपल्या बहीणीलाही ते पहीली डॅाक्टर बनवतात. ते असे म्हणतात,की मी अशा समाजात जन्माला आलो होतो, की जिथल्या लोकांचं उकीरडा हेच जीवन होतं.मी उकीरड्याशेजारीच जन्मलो,तिथंच वाढलो,त्यातलं उष्टं,शिळं,इतरांनी फेकलेलं अन्न उचलून ते पोटात ढकलत,भंगार गोळा करुन,ते विकुन त्यावरच शाळेसाठी एक-एक पुस्तक-वही गोळा करत शिकत गेलो.ते शिक्षण घेणं सोपं नव्हतंच.अंधश्रद्धा,रुढी-परंपरांशी,जातपंचायतीशी लढा देत आज इथपर्यंत पोहचलो.मी गोसावी समाजातला पहीला शिक्षक. मला असं वाटतं,की भंगार गोळा करणारे हे खरे तर देशाचे खरे स्वच्छता रक्षक; पण आजही त्यांच्या वाट्याला अस्वच्छ,घाणीने बरबटलेलं,भयानक रोगांनी पिंजारलेलं जीवनच आहे. अशाही परिस्थितीवर मात करत अशोक जाधव समाजातले पहीले शिक्षक झाले.पण इतरांच काय ?आजही अशी लाखो मुलं अशा घाणीत आपलं आकाश शोधत आहेत…त्यांना त्यांच आकाश मिळेल का? हे सगळं खुपचं अस्वस्थ करणारं आहे. अशोक जाधव यांनी अल्पवयात जे कार्य केलं,त्यांनी जो संघर्ष केला त्याबद्दल त्यांच खुप सारं कौतुक नि अभिनंदन सुद्धा.असा संघर्ष कोणाच्या आयुष्यात यायला नको एवढच वाटतं हे पुस्तक वाचल्यानंतर.ज्यांनी कोणी हे पुस्तक वाचलं असेल किंवा भविष्यात वाचतील त्यांच्या मनात समाज बदलाचे अंगार फुलल्याशिवाय राहणार नाहीत.ती उर्जा या पुस्तकात पानोपानी भरली आहे;ती भविष्यात कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच. पुनःश्च एकदा सर तुमच्या संघर्षाला कोटी कोटी सलाम..!
Reviews
There are no reviews yet.