आपल्या विचारांचं आपल्यावर कसं नियंत्रण असतं, हे सांगणारं विज्ञान
आपल्या स्वत:च्या विचारमंथनाबाबतचं तुम्हं मत हे पुस्तक वाचल्यावर नेहमीसाठी बदलून जाईल. डॉ. ब्रुस एच. लिप्टन या प्रख्यात पेशीशास्त्रज्ञानं आपल्या विचारांचा आपल्या शरीरातल्या पेशींवर कसा प्रभाव पडत असतो, याबद्दलचे धक्कादायक नवीन वैज्ञानिक शोध या पुस्तकामध्ये सांगितले आहेत. मेंदूच्या कार्याच्या जैवरासायनिक परिणामांमुळे पेशी प्रभावित होत असतात. विचारांचा पेशींवर कसा परिणाम होतो, हे लिप्टन यांनी अगदी रेण्वीय पातळीवरच्या घडामोडी समजावून देत स्पष्ट केलं आहे. हलकासा विनोदाचा शिडकावा करणाऱ्या साध्या-सोप्या भाषेत मुद्दा समजावून सांगणं आणि दैनंदिन जीवनातली उदाहरणं देणं ही त्यांच्या लिखाणाची उल्लेखनीय वैशिष्ट्यं.
एपिजेनेटिक्स हे नवं विज्ञान आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, तसंच संपूर्ण मानवजातीच्या आयुष्यावर कसं परिणाम करतं या संशोधनाचे निष्कर्ष, आपल्या आतापर्यंतच्या जीवनाबद्दलच्या संकल्पनांना आमूलाग्र बदलून टाकणारे आहेत. आपली जनुकं आणि डीएनए आपल्या आयुष्याचं नियंत्रण करीत नाहीत, तर पेशीच्या बाहेरच्या वातावरणातून येणाऱ्या संदेशांमुळे डीएनएचं नियंत्रण होत असतं. पेशीबाहेरच्या वातावरणातून मिळणाऱ्या संदेशांमध्ये आपल्या (सकारात्मक किंवा नकारात्मक) विचारांतून तयार होणाऱ्या ऊर्जातरंगांचाही समावेश असतो, असं लिप्टन म्हणतात.
पेशी विज्ञान आणि क्वांटम फिजिक्सच्या आधारानं केलेलं हे संशोधन कमालीचं आशादायी आहे आणि त्याची सर्वत्र विज्ञान जगतातला क्रांतिकारी शोध, अशी प्रशंसा होत आहे. आपल्या विचारांना योग्य ते वळण देऊन आपल्या आयुष्यात बदल घडवता येतात असं हे संशोधन सांगतं.
Reviews
There are no reviews yet.