Description
जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट. विशाल हिमतीची माणसं या शिखराला गवसणी घालत असतात. आपल्या मराठी मातीतही असे एव्हरेस्टवीर आहेतच. पण पुण्यातल्या `गिरिप्रेमी` या संस्थेतर्फे एक-दोन नव्हे, तर तब्बल तेरा गिर्यारोहकांची महत्त्वाकांक्षी मोहीम काढली गेली. हजारो लोकांच्या पाठिंब्यामुळे ही मोहीम अभूतपूर्व ठरली. एव्हरेस्टचं आव्हान माणसाच्या सर्वोच्च क्षमतांची परीक्षा घेणारं असतं. शरीर आणि मन यांना अपार टणक बनवलं, तरच हिमालयातील सर्वस्वी विपरीत वातावरणात टिकाव लागू शकतो. एव्हरेस्ट गाठता येऊ शकतं. या मोहिमेत हे सर्व कसं घडलं? सह्याद्रीच्या कडेकपारीत बागडणा-या मावळ्यांनी एव्हरेस्टवर मराठी झेंडा कसा फडकवला? गिर्यारोहण हा खेळ समाजात रुजवण्याचा ध्यास बाळगलेल्या गिर्यारोहकांच्या असीम धैर्याची आणि परिश्रमांची गाथा सांगितली आहे मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी.जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पुण्याचा झेंडा रोवणाऱ्या साहसी वीरांच्या ध्यासाची ही कहाणी आहे. साहस, हिंमत, कठोर परिश्रमाची ही गाथा एव्हरेस्ट मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी सांगितली आहे. या वीरांनी एव्हरेस्टचे उत्तुंग स्वप्न कसे पाहिले, ते आव्हान पेलण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी कशी केली हे प्रारंभी समजते.या महत्वाकांक्षी मोहिमेसाठी येणाऱ्या खर्चासाठी निधीची उभारणी कशी केली, हे मुळातून वाचण्याजोगे आहे. या तयारीनंतर वाचायला मिळतो तो प्रत्यक्ष मोहिमेचा थरार. बेस कॅम्पच्या दिशेने जाताना, एव्हरेस्टच्या अंगाखांद्यावर चालताना आलेले अनुभव वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. टप्प्याटप्प्याने अखेरच्या चढाईपर्यंत केलेली वाटचाल आणि शिखरावर माथा टेकवताना झालेला आनंद वाचकाला स्तिमित करतो.
Reviews
There are no reviews yet.