Description
इ. स. पूर्व 300 वर्षापूर्वीची ही कहाणी. त्यावेळी भारतात अनेक गणराज्य नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. आपापसात सतत संघर्ष होत होती. मगध हे त्यांपौकीच एक ! त्या राज्याचा राजा धनानंद हा विलासी राजा होता. अतोनात कर लावून तो प्रजेची पिळवणूक करीत असे. त्याच्या अनियंत्रित कारभाराला प्रजा कंटाळली होती. चाणक्य विष्णुगुपत हा त्या राज्यातील एक तेजस्वी ब्राह्मण. तक्षाशिलेला जाऊन विद्यासंपन्न झालेल ! राजाचा दानाध्यक्ष या नात्यानं काम करताना धनानंद राजानं त्याचा अपमान केला. ते पाहून चाणक्यनं शपथ घेतली की, उन्मत्त धनानंद राजाचं सिंहासन मी यथावकाश उलथून टाकीन.’ त्याच वेळी जगज्जेता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून ग्रीक सेनानी सिकंदर यानं भारतावर आक्रमण केलं. चाणक्यानं अपार परिश्रम करून सिकंदराचं आक्रमण थोपविण्यासाठी अनेक योजना आखल्या. त्याचीच परिणीती म्हणून सिकंदराला भारतविजेता न होता परतावं लागलं. चंद्रगुप्ताला हाताशी धरून चाणक्यानं त्याला उत्तम शिक्षण दिलं. अनेक तेजस्वी तरुणांची एक मळी उभी केली आणि अनेक युक्त्या-प्रयुक्त्या योजून त्यानं धनानंद राजाला पदच्युत केलं. त्याच्या सिंहासनावर चंद्रगुप्त मौर्याला अधिष्ठित करून त्याच्याच सहाय्यानं चाणक्यानं एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारत निर्माण केला. आपल्या आयुष्याच्या उतरार्धात “कौटिलीय अर्थशास्त्र’ हा ग्रंथ लिहून भारतीय साहित्यात अनमोल भर घातली. अशा या नृपनिर्मात्या युगंधर क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील ही ललितरम्य कादंबरी अनेक नाट्यपूर्ण, रहस्यमय प्रसंगांनी सजलेली !
प्रचलित असलेल्या ‘चाणक्यनीती’च्या आणि प्रसिद्ध असलेल्या ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’च्या ‘चाणक्य’वर संदर्भांचा छडा लावून लिहिली गेलेली ही कादंबरी. स्वत: सत्तेपासून अलिप्त राहायचे पण सत्ता परकीयांच्या हातातून दिसणार नाही म्हणून डावपेच रचायचे, त्यासाठी एखाद्या चंद्रगुप्ताला अगदी श्रीगणेशापासून तयार करायचे न् प्रजाहित साधण्याचा प्रयत्न करायचा हे सारेच अजब आहे म्हणूनच अशी व्यक्तिरेखा लेखकालाही आव्हानात्मक आहे, असे मूळचेच जबरदस्त कथानक लेखकाचीही परिक्षा घेणारे आहे अर्थात भा. द. खेर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ लेखकाला हे शिवधनुष्य न पेलवते तरच नवल ! खेर ह्यांनी ते कसे समर्थपणे पेलले आहे हे एकदा वाचलेच पाहिजे असे आहे.
Reviews
There are no reviews yet.