श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचा स्त्रीभ्रूणहत्या या विषयावरील आठ कथांचा हा थीम बेस्ड कथासंग्रह ज्वलंत प्रश्नाचे दाहक दर्शन घडवितो. स्त्रीभ्रूणहत्येची समस्या नवी नाही. वेगवेगळ्या समाजाने मुली नाहीशा करण्यासाठी वेळोवेळी अनेक मार्ग योजलेले आपण पाहिले आहेत. पण अशी प्रथा समाजाच्या मूकसंमतीने प्रत्यक्षात येते आणि सर्व समाज जणू काही, काही घडलेच नाही असा आव आणीत असतो. कोणत्याही सामाजिक कुप्रथेला जेव्हा लोकमानसातील पूर्वग्रह कारणीभूत असतात, तेव्हा केवळ प्रबोधन वा कागदावरचा कायदा पुरेसा ठरत नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि ती प्रत्यक्षात उतरवायला प्रशासकीय इच्छाशक्ती आणि नियोजन लागते.
अशीच इच्छाशक्ती दाखवून श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापूरला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर ‘सेव्ह द बेबीगर्ल’ हा उपक्रम राबविला. या संग्रहातील कथा कोल्हापूरच्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर घडतात, याचे महत्त्व वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छिते. स्त्रीभ्रूणहत्येचा विचार करताना हे सारे अल्पशिक्षित दरिद्री समाजात घडत असेल असा एक समज असतो. वस्तुस्थिती वेगळे चित्र पुढे आणते. सधन आणि सुशिक्षित समाजात बालिकांचा जन्मदर घटतो आहे, हे वास्तव लक्षात घेता कोल्हापूरची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. या कथांमध्ये व्यवस्था, कुटुंब रचना याकडे विचक्षणपणे पाहणार्या लेखकाने मानवी नात्यांकडे मात्र संवेदना क्षमतेने पाहिले आहे. माणसांच्या मनातील तरल भाव, गर्भवतीच्या मनाची हळवी अवस्था आणि बाहेरचे जग यातील विरोधही कथात व्यक्त होतो. ‘सेव्ह द बेबी गर्ल’ या उपक्रमासाठी आणि त्या उपक्रमाचाच ललित दस्तावेज असणार्या कथांसाठी मराठी वाचक देशमुखांचे आभार मानतील. महत्त्वाच्या विषयावरच्या या पुस्तकाचे परिशिष्टही प्रस्तुत आणि वाचनीय आहे.
(- पुष्पा भावे, प्रस्तावनेतून)
Reviews
There are no reviews yet.