डॉ. मनीषा जगताप यांचे ‘मातृत्व वेदना आणि विद्रोह’ हे पुस्तक म्हणजे स्त्रीला समजून घेण्याचा आणि सांगण्याचा एका संवेदनशील मनाने केलेला यशस्वी प्रयत्न आहे. डॉ. मनीषा या केवळ स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत, तर साहित्य आणि संस्कृतीची खोलवर जाण असणाऱ्या विदुषी आहेत, हे त्यांच्या लिखाणावरून आणि जीवनानुभवावरून स्पष्ट होते.
‘मातृत्व’ हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. परंतु या विषयाचे किती पदर आहेत याबद्दल आपण अज्ञानी असतो. हे सारे पदर डॉ. मनीषा यांनी त्यांच्या लिखाणात उलगडून दाखविले आहेत. म्हणूनच हे पुस्तक केवळ स्त्रियांपुरतेच सीमित न राहता ते सर्वांनीच आवर्जून वाचावे असे झाले आहे.
डॉ. मनीषा या जशा एक यशस्वी डॉक्टर आहेत, तशाच त्या समाजजीवनाकडे समरसून बघणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या एक व्यक्तीही आहेत. अलीकडे ही वृत्ती समाजजीवनातून लोप पावत आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या विश्वात मग्न असते, परंतु आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याची जाणीव असल्याशिवाय, वाईटात हस्तक्षेप केल्याशिवाय आणि चांगल्याला उत्तेजन दिल्याशिवाय, जगताना माणूस म्हणून आनंद उपभोगता येत नसतो.
आपल्या रुग्णाप्रती संवेदना, साहित्य आणि संस्कृतीतून लाभलेली विशाल दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचे स्वीकारलेले व्रत, या डॉ. मनीषा यांच्या जीवनप्रेरणा आहेत. म्हणून त्यांचे लिखाण आपल्या जाणिवा विस्तृत करणारे झाले आहे. त्यांना शुभेच्छा.
• रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत
Reviews
There are no reviews yet.