त्यांच्यातल्या एकाने बजाला सांगितलं, ‘अरे! शेटजींना विचार ना काय हवं ते! कामाची माणसं ती! मघापासून बसली आहेत ना!’ पण बजा काही बोलायच्या आधी मीच म्हणालो, ‘मळ्यावर दोन रात्री लागोपाठ काय झालं सार्याी गावाला माहीत आहे. माझी दोन जनावरं दगावली, पांडुरंगचाही बळी गेला. आता बजाला विचारायला आलोय. का रे बाबा, कोण कोपलं माझ्यावर? कोणी करणी केली का? कोणी वाइटावर आहे का? आमच्या घरच्या कोणाकडून काही आगळीक झाली का? काही कोणाची शांत करायला हवी का? काय भानगड आहे पाहा तरी बजा!’ आता सगळ्यांच्या नजरा बजाकडे वळल्या. कारण सांगता येत नाही; पण बजा जरासा घुटमळत होता. खरोखरच त्याला यातलं काही कळतं का तो आपला चार पैशांसाठी लोकांना बनवतो मला माहीत नाही. अशा काही शक्ती असतीलच तर त्या इतक्या भलत्याच माणसांच्या अंगी दिसतात की सांगता येत नाही. पोलीस काहीही शोध लावू शकले नव्हते. इतर कोणताही उपाय करायला मी तयार होतो. शेवटी बजा म्हणाला, ‘शेटजी, आज संध्याकाळी मळ्यावर येतो. जागेवरच पाहतो.
Reviews
There are no reviews yet.