‘बांधकाम क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणून कल्पकतेने ते यशस्वी करून दाखविणारे धडाडीचे उद्योजक म्हणून बी.जी.शिर्के हे महाराष्ट्रास सुपरिचित आहेत. ‘शिर्के म्हणजे सिपोरेक्स’ हे समीकरण कोणास सांगावयास नको. परंतु या भव्य यशामागे केवढे अपार कष्ट, सततचे संघर्ष, उत्तमतेचा ध्यास, ध्येयसिध्दीची जिद्द, भ्रष्टाचाराची चीड व समाजसुधारणेची आच या गोष्टी दडलेल्या आहेत, हे अनेकांना माहीत नसेल. अनेक संकटांवर मात करीत व प्रतिकूल परिस्थतीशी झुंज देत स्थापत्य क्षेत्रात नवे तंत्र-मंत्र आणूनच शिर्के स्वस्थ बसले नाहीत; तर बांधकाम क्षेत्रातील गैरव्यवहार व देशाचे नुकसान करणा-या चुकीच्या पध्दती यांच्यावर ते घणाघाती हल्ले चढवीत आले. कधी शासकांचा तर कधी समव्यावसायिकांचा रोष पत्करून नुकसान सोसले; पण धडाडी, जिद्द व आशावाद सोडला नाही. म्हणून घरबांधणी क्षेत्रातील सर्व सुविधा एकाच छत्राखाली पुरविणारा जगातील एकमेव उद्योग म्हणून बी.जी.शिर्के आणि कंपनीने ख्याती मिळवली आहे. सातारा जिल्ह्यातील पसरणी या लहानशा खेडयात छोटया शेतक-याच्या घरात जन्मलेला बहुजन समाजातील हा मुलगा. शिक्षणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, उद्योजकतेची परंपरा नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीत साहसी जिद्दीने शिक्षण पूर्ण करून व्यवसायाचा ध्यास घेऊन त्यात यशस्वी झालेले हे विलक्षण उत्साही व्यक्तिमत्व. शिर्के यांच्या व्यक्तिगत, व्यावसायिक व सामाजिक संघर्षाची त्यांनीच आपल्या वैशिष्टयपूर्ण शैलीत सांगितलेली ही कथा उद्योजकतेची स्वप्ने पाहणा-या धाडसी मराठी तरूणांना स्फूर्तिदायक ठरेल, यात शंका नाही. त्याचबरोबर व्यवसायातील गैरप्रकारांचा त्यांनी केलेला दंभस्फोट वाचून अनेकांना धक्काही बसेल. अशी मराठीतील अपूर्व व्यावसायिक आत्मकथा, व्यक्तिगत जीवनातील संघर्षाचे संवेदवशील पदर असलेली एका उद्योगी माणसाची आत्मकहाणी. ‘
Reviews
There are no reviews yet.