कृष्णविवर ‘ब्लॅक होल’ हा शब्द आणि त्याची संकल्पना ही जेमतेम गेल्या शतकातील. पण त्याच्या एकूण संकल्पनेचेच वेगळेपण एवढे आहे, की हे काहीतरी गूढ आहे, ही भावना झाल्यानेच बहुधा, हा सगळ्यांचाच कुतूहलाचा विषय बनला आहे.
आकाश-अवकाश-तारे यांच्या बाबतीत बोलताना, अगदी लहान मुलांशी चर्चा करताना, त्यांच्याकडून ‘कृष्णविवर म्हणजे काय ?’ अशी विचारणा होतेच होते.
ही कृष्णविवराची संकल्पना काही एकदम आली नाही, की त्याचा शोध अचानक लागला नाही. ताऱ्यांची निरीक्षणे करताना, त्यांच्या गतींचे, हालचालींचे निरीक्षण करताना आधी ‘श्वेत बटु’ म्हणजे लहान आकाराचे पण वस्तुमान मात्र सूर्याएवढे असणारे तारे सापडले. ते कसे बनले असावे याचे संशोधन सुरू असताना, त्यांच्यापेक्षा लहान आणि स्वत:भोवती वेगात फिरणारे रेडिओ प्रारणे फेकणारे ‘पल्सार’ म्हणजे ‘न्युट्रॉन तारे’ सापडले. हे तारे ठराविक ताऱ्यांच्या मृत्यूच्या वेळी होणाऱ्या ‘सुपरनोव्हा’ उद्रेकातून तयार होतात हे समजल्यानंतर, त्याहून प्रचंड महाकाय ताऱ्यांचा मृत्यू झाला तर काय होईल हा खगोलभौतिकीचा प्रश्न समोर आला. त्यातून कृष्णविवराची संकल्पना उदयास आली.
हे न दिसणारे पण प्रचंड गुरुत्वाकर्षण असणारे कृष्णविवर त्याच्या आसपासच्या अवकाशावर जे परिणाम दाखवते, त्यामुळे ते कोठे आहे ते समजते. पण ते निरीक्षणातून प्रत्यक्षात मिळण्यासाठी अनेक वर्षे मधे जावी लागली.
कृष्णविवराकडे घेऊन जाणारी शोधांची ही मालिका या पुस्तकात आपल्याला सचित्र पाहायला मिळेल. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनाही थोडक्यात आणि नेमके असे कृष्णविवराबद्दल सांगणारे हे पुस्तक आपल्या विज्ञान ग्रंथ खजिन्यात हवेच हवे.
Reviews
There are no reviews yet.