मराठी साहित्यातील कविता आणि कथा या क्षेत्रांत नीरजा यांनी स्वत:चे एक स्थान तयार केले आहे. ‘ थिजलेल्या काळाचे अवशेष’ ही त्यांची पहिलीच कादंबरी, या क्षेत्रातही त्या आपला ठसा निर्माण करतील, असा विश्वास देऊन जाते. स्वातंत्र्यानंतर भारत या देशातील समाज घडवताना निरनिराळ्या क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्तींची विवक्षित भूमिका होती. ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयीला महत्त्व देणारी, विविधतेचे महत्त्व जाणून तिचा आदर करणारी आणि मानवतावादी चेहरा असणारी होती. गेल्या दशकात ही भूमिकाच बदललेली दिसते. आता ती निरनिराळ्या अस्मितांमध्ये विद्वेष निर्माण करणारी, बहुमतशाहीवादी, धर्म आणि राजकारण यांचे संयुग करू पाहणारी आणि अतिरेकी राष्ट्रवादी झाली आहे, असे जाणवते. या बदलामागची कारणे अत्यंत गुंतागुंतीची आहेत आणि मुख्य म्हणजे हा बदल लोकशाहीच्या मार्गानेच झालेला आहे. आधीच्या काळात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या तत्त्वांचा पाठपुरावा करतील अशा अनेक संस्था काढल्या होत्या. त्यातील एक होते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ – जेएनयू. १९८०च्या दशकात तिथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. त्यातील नजमा ही व्यक्तिरेखा तीन दशकांनंतर त्या गटातील जगभर विखुरलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना स्वतंत्रपणे आणि शेवटी एकत्रितपणे भेटते. या भेटीत प्रत्यक्षात विशेष काहीच होत नाही. पण त्यातून नीरजा गेल्या तीन दशकांत झालेले बदल आणि त्यामागची व्यामिश्र कारणे यांची चर्चा ताकदीने मांडतात, आणि त्या अनुषंगाने घडलेली पात्रे आणि आजच्या काळातले त्यांचे जगणे आपल्यासमोर जिवंत करतात. मराठीत चर्चा-नाटकांची परंपरा आहे; निदान माझ्या माहितीत चर्चा-कादंबऱ्यांची. त्या मानाने कमी आहे. ही कादंबरी साहित्याच्या या दालनात मोठीच भर घालते. ही कादंबरी, ठोस भूमिका असूनही, अभिनिवेश टाळत, सर्वांप्रती काही किमान सहानुभूती आणि आदर बाळगत, गेल्या काही दशकांतील बदललेल्या वास्तवाबाबत व्यापक परिस्थितीभान देते, हे या कादंबरीचे सर्वात मोठे यश आहे. मकरंद साठे
Reviews
There are no reviews yet.